Sunday 16 October 2011

जीवन कलेची साधना - खरा देव

जय गुरुदेव 
          परमेश्वर प्राणि-पदार्थात ओतप्रोत भरलेला असून तो आपल्या मानवी देहात हि  वसलेला आहे. या विधानामुळे आपणास शंका येईल,कि तो एवढा मोठा, विश्वात भरलेला अनंत (परमेश्वर) आपल्या इवल्याशा मानवी देहात वसतो, हे खरे कसे मानावे?तर जरा विचार करा :-
          आपला मानवी देह हा कोणत्यातरी एका अदृश्य चैतन्यशक्तीवर जिवंत राहिलेला आहे. ती चैतन्यशक्ती जेव्हा हा देह सोडून जाते तेंव्हा तो देह प्रेत होतो   (अर्थात मनुष्य मरतो). तेंव्हा, मानवी देहात जी चैतन्यशक्ती चेतना उत्पन्न करून देहास जिवंत ठेवते तिलाच विद्वानांनी 'जीव' असे नाव दिले. हा जीव जाताना व येताना दिसत नाही. जे वस्तू डोळ्याने दिसत नाही तिला अमूर्त वा निराकार वस्तू म्हणतात आणि ती वस्तू निराकार असल्यामुळे आपल्याला डोळ्याने दिसत नाही. कारण, आपल्या डोळ्यातील दृष्टी हि सृष्टी (आकारी पदार्थ ) पाहण्याच्या लायकीची आहे. यावरून, तो जीव निराकार आहे, हे सिद्ध होते.
         आपल्या देहात जीव आहे. करारन, याक जीवामुळे देह जिवंत राहतो. पण 'आपल्या देहात देव राहतो' हे कसे काय ? आता या प्रश्नाचा विचार करू .
           जेंव्हा आपण जागे असतो तेंव्हा आपण डोळ्यांनी पाहतो, कानांनी ऐकतो, तोंडाने बोलतो, हातांनी देवाण - घेवाण करतो व पायांनी चालतो. पण, जेंव्हा आपण भोजन केल्यानंतर रात्री अंथरुणावर गाढ झोपी जातो त्या गाढ झोपेतील स्थितीबद्दल विचार करूया . तर गाढ झोपेत या सर्व क्रिया बंद असतात. तर या सर्व क्रिया का बरे बंद असतात, तर उत्तर असे मिळते कि या सर्व क्रिया जीवामार्फत चाललेल्या असतात. आणि जीव हा निद्रेच्या सुखानंदात निमग्न होतो , त्यावेळी ह्या सर्व क्रिया इंद्रियाकडून  करवून घ्यायला इंद्रियांचा कोणी 'मालक' असा कोणीच नसतो. ज्या प्रमाणे मालक झोपी गेला, म्हणजे त्याचे सर्व नौकर झोपतात. तद्न्याय जीवरूपी मालक झोपला म्हणजे इंद्रीयरूपी नौकर स्वतःची कामे सोडून देतात. त्या गाढ झोपेत जीवाला देहाची आठवण सुद्धा रहात नाही. आपणा सर्वाना या गोष्टीचा नित्य अनुभव येतो. कि जेंव्हा आपण गाढ झोपी जातो तेंव्हा आपल्या स्वतःच्या देहाची आपल्याला मुळीच आठवण राहत नाही. एवढेच नव्हे तर आपल्या अंगावरील सर्व अलंकार चोर चोरून घेवून जातो तरी हि ते आपणा स्वतःला काही समजत नाही, ज्या घरात आपण झोपतो त्या घराची आठवण आपणास नसते ; एवढेच नव्हे तर त्या गाढ निद्रेत ज्या देहरूपी घरात जीवरूपी आपण झोपतो त्या देहरूपी घराची सुद्धा आपणास आठवण नसते. आता विचार करू, आपण जेवण करून झोपलो होतो. त्या खाल्लेल्या अन्नाची  पचनक्रिया त्या गाढ झोपेत ही चालू असते, त्या अन्नापासून अन्नरस व अन्न्रासाचे रक्तात रुपांतर व रक्तातून मासादी धातूंची उत्पत्ती  ह्या क्रिया चालू असतात, म्हणजे क्रिया म्हटले कि कर्ता आलाच पाहिजे. कारण कर्त्या शिवाय क्रिया होत नाही. तेंव्हा या सर्व क्रिया आपल्या देहात कोण करतो ?
        आपण म्हणू या जीव करतो, परंतु आपण पहिले कि जीव तर निद्रेच्या सुखानंदात निमग्न असतो, व त्याला तर देहाची व इंद्रीयांचीही  आठवण नसते तर मग या सर्व क्रिया तो कसा काय करू शकेल ?
                                                                                                                                         क्रमश :         

.       



1 comment: